प्रश्न

प्रश्न अनेक…
पडतात जीवघेणे…
उत्तरांना नसते…
त्यांच्याशी फारसे देणेघेणे…

काही प्रश्न…
असतात अगम्य…
उत्तरे मिळविणे त्यांची …
फार कठिण कर्म…

काही प्रश्न…
असतातच छळवादी…
उध्वस्त आयुष्याचे…
साक्षी प्रमाण वादी…

काही प्रश्न का पडतात …
कळत नाही…
उत्तरे त्यांची…
आयुष्य भर मिळत नाही…

काही प्रश्न मात्र…
वाटतात हवे हवे…
उत्तरे त्यांची…
गोड गुपितांचे ठेवे…

जयंत प्र. पोतदार

धर्म

कोणीतरी म्हटलेच आहे की धर्म ही अफूची गोळी आहे. वास्तविक पाहता एखाद्या विशिष्ट धर्मात किंवा आपल्याला आवडणा-या धर्मात जन्म घेणे हे आपल्या हातात नसते; हाच दुवा घेऊन जर विचार केला तर, जन्म घेतल्यानंतर होणा-या धार्मिक संस्कारांच्या मा-याचा परिपाक जर माणसाला धर्मांध अथवा धार्मिक बनण्यास उद्युक्त करत असेल तर ते त्या धर्माचे फार मोठे अपयश आहे असे मी समजतो.

प्रत्येक धर्माची एक स्वतंत्र विचारधारा असते. बरेच जणांच्या मते हिंदू हा धर्म नसून एक विचारधारा आहे संस्कृती आहे. माझे म्हणणे असे आहे की प्रत्येक धर्म हा एक स्वतंत्र विचारधारा आहे, संस्कृती आहे.

हिंदु धर्मानी सहिष्णुता शिकवली पण रूढी परंपरा आणि कर्मकांडात वाया गेला. वर्षभर सण, उत्सव साजरे करणे ते पण रस्त्यात खड्डे करून, ध्वनीप्रदूषण करून समाजाला त्रास देऊन हिंदु धर्माच्या अनुयायांना कसला आनंद मिळतो कोण जाणे. हिंदु धर्म सहिष्णु म्हणावा तर आपले दलित बांधव हिंदु धर्म सोडून इतर धर्मात का जातात? सगळाच गोंधळ.

कट्टर हिंदुत्ववादी सावरकरांच्या नावाचा सोयीस्कर वापर, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चाललेले राजकारण हे बघून उबग येतो. सावरकर आदर्श म्हणावेत तर तथाकथित हिंदुत्ववादी गोरक्षक सावरकरांच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाच्या विचारांचा आदर करताना कुठेच दिसत नाहीत. सावरकरांनी तर स्पष्टपणे सांगितले आहे की गाय हा उपयुक्त पशू आहे.

शिवाजीमहाराजांचे विचार अंगी बाळगताना तर त्यांचे अनुयायी कधीच दिसले नाहीत. शिवस्मारक बांधण्यात सर्व सामान्य करदात्यांचे पैसे घालविण्यापेक्षा आहेत त्याच गड किल्ल्यांचे संवर्धन करून महाराजांचे विचार अंगिकारले तर फार बरे होईल पण त्यांच्या अनुयायांचे विचार; महाराजांचे नाव वडा पावाला देण्यापलीकडे जातच नाहीत.

इस्लाम धर्माची जगभर चाललेली वाताहत तर आपण बघतच आहोत. सगळ्यात तरूण धर्म बहाई ज्याचा जन्म इराण मध्ये एकोणीसाव्या शतकात झाला. सर्वधर्म समभाव आणि सगळ्यांचा देव एक आहे या तत्वज्ञानावर आधारीत. त्याचे तत्वज्ञान चांगले आहे पण समस्या ही आहे की कोणत्याही धर्माचे अनुयायी जेव्हा आपापल्या धर्माचे अतिरेकी अंधानुकरण करतात तेव्हा अहंकार निर्माण होतो आणि हेच घातक आहे. म्हणून प्रत्येकाने आत्मचिंतन केले पाहिजे कदाचित साक्षात्कार झाला तर समजेल की मानवधर्म हाच सगळ्यात जुना आणि चिरंतन धर्म आहे. चला तर धर्मांतर करूया मानवधर्मात पुन्हा एकदा.

जयंत प्र. पोतदार

चेहरा

चेहरा एक आरसा…
जसा भाव दिसे तसा…
स्वच्छ किती करीसी जरी…
प्रमाण मनाचा आरसा…

स्वच्छ नितळ मन…
भाव सुंदर निरागस…
चेहरा दाखवी तत्पर…
आरसा जणू मनाचा दाखला…

चोपडले पावडरीचे थप्पे…
मनात दुष्ट कपट कप्पे…
चेहरा दिसे बेरकी वाकडा…
काय करेल आरसा बापुडा…

दोष देसी जरी आरशास…
डोकावं जरा स्व मनात…
जळमटे मनातील कर साफ…
प्रतिबिंब मनाचे स्वच्छ भासेल हा चेहरा…

जयंत प्र. पोतदार

शब्द

शब्द भेटले जीवनपथावर…
काही मृदू कोमल त्यातील…
काही सुमार…
मात्र काही धारदार …

बघत होते माझ्याकडे…
ठेवून आशावाद…
मी पण होतो…
बघत सावध…
घेऊन अंदाज अपार…

कापत होतो वाट जीवनाची…
पारखूनी त्यांचा बाज…
काही शब्द हळूवार फुंकर…
काही कावेबाज…

वेचत गेलो बरे चांगले…
काही मात्र मी…
उगा झेलले…
काहींचा भडिमार…

होते शब्द काही…
‘काटे’ चिवट …
रुतले होते…
खोलवर दुष्ट…
ठुसठूस त्यांची…
करी अस्वस्थ…

टाकले उखडून…
एकदाच त्यांना …
मनावर स्वतःच…
घालून फुंकर …
मोकळे झाले मन…
उतरवला मनाचा भार…

जयंत प्र. पोतदार

आठवणींचा पाऊस

तुझ्या आठवणींचा पाऊस…
मनात बरसून गेला…

स्मृति फुलांचा गंध…
पुन्हा दरवळून गेला…

एकाच छ्त्रीत भिजतानाचा…
तो स्पर्श मोहरवून गेला…

पावसात पुन्हा भेटण्याचे…
वचन आठवून गेला…

विसरलीस तू सारे जरी…
तुझ्या आठवणींचा पाऊस…
मला भिजवून गेला…

जयंत प्र. पोतदार

पाकळ्यांचे पक्षी

पाकळ्यांचे पक्षी झाले…
आठवणींचे मळे फुलले…
पाना आडून…
डोकावणा-या फुला…
तू माझे मन जिंकले…

दवबिंदू जणू…
अश्रू गाली…
त्यावर सप्तरंगांची लाली…

भेदून किरण…
त्यास जाता…
आठवणींचे इंद्रधनुष्य झाले…

आठवणी काही…
कोमल पाकळ्या…
काहींना काट्यांच्या माळा…

मृदु स्पर्श…
हृदयाशी घेऊन…
काट्यांना मी…
खुडून टाकले…

पाना आडून…
डोकावणा-या फुला…
तू माझे…
मन जिंकले…

जयंत प्र. पोतदार

गंजलेल्या बंदुका

मी काय म्हणतो…
आतंकवादी हा…
आतंकवादी असतो…
तरी आपण पाकिस्तान ला…
का पुसतो…

वाट बघत आहात का…
पाकिस्तानच्या दुजो-याची…
मला हा प्रश्न…
नेहमी पडतो…

असेच जर असेल…
तर सत्ता बदल…
खरोखरच झाला का…
हा प्रश्न उरतो…

आतंकवादी ना हिंदु…
ना मुस्लिम असतो…
तरी पण धर्माचा…
उहापोह का करतो…

फुका चर्चा…
कश्मिरीयत वगैरे…
उगाचच वेळ दवडतो…
गंजल्या असतील बंदुका…
तर सांगा…
वंगणाची सोय करतो…

जयंत प्र. पोतदार

GST च्या देशा

GST च्या देशात…
चालले आहे सगळं मस्त…
कसाबला शाही बिर्यानी…
भाविकांच्या मरणाची किंमत येथे स्वस्त…
फार नाही दहा लाख फकस्त …

जगणे महाग मरणे स्वस्त…
लिपस्टिक महाग कुंकू स्वस्त…
विधवेच्या बांगड्यांची…
किंमत येथे स्वस्त…

‘शोभेच्या’ पत्रकारांची वेश्यावृत्ती…
येथे चाले मस्त…
‘पाच वर्षाच्या’ सरकारी सेवेला…
आजन्म पेन्शनची भिस्त…
दिमतीला झेड प्लसची असे गस्त…

सामान्यांना मात्र येथे…
रोजच जीवाची धास्त…
GST च्या देशात…
चालले आहे सगळं मस्त…

जयंत प्र. पोतदार

(अ)सहिष्णूतेचे बळी

काल पर्यंत गुरगुरणारे…
सत्तेच्या पिंज-या बाहेरचे वाघ…
आज सत्तेच्या पिंज-यात गेल्यावर….
का बरे गुरगुरत नाही…

निखा-यातले कोळसे…
अजून कसे पेटत नाही…
धगधगणा-या ठिणग्या…
कुठेच कशा दिसत नाही…

सगळीकडे धूर…
पसरलाय संशयाचा…
धुसरता अजून…
कशी विरत नाही…

सत्तेच्या शेगडी बाहेरचे कोळसे…
शेगडीमध्ये गेल्यावर…
का बरे…
फुलत नाही…

कोळसे सुद्धा सोकावले…
असतील कदाचित…
उब घ्यायला…
एकहाती सत्तेची आणि मजाही …

देव सुद्धा खरोखरच…
दगड झाला आहे की…
देवापेक्षा अंधभक्तांची…
व्यक्ती पूजा येथे आहे उतराई…

किती दौरे…
किती कळकळ…
भारताला आर्थिक…
महासत्ता बनविण्याची घाई…

जरा देशाच्या…
आत पण बघा साहेब…
जाणून घ्या जळणा-या …
देहाची किंमत आणि लाही…

अजून किती बळी…
अजून किती संयम…
सामान्यांची सहनशक्ती…
अजून कशी संपत नाही…

जयंत प्र. पोतदार

विचारबंदी

विचारबंदीच्या देशात…
नोटबंदी आली…
भ्रष्टाचाराची मंडी…
मंद झाली…

अंधश्रद्धेचे दलाल…
भ्रष्टाचाराच्यां पुजा-यांवर…
ही काय…
आफत आली…

बंद पेट्या…
देवळातले धन…
देवाला गरीब…
करून गेली…

लुटलेला पैसा…
गरीबांचे शोषण…
स्विस बॅन्केची…
चर्चा झाली…

कर्ज शेतक-यांचे…
माफ कराया…
मंडळी धनदांडगी…
पुढे सरसावली…

क्रिकेटच्या देशात…
सामान्य विचारवंताची
असामान्य मती…
कुंठित झाली…

कर पिडीत…
पिचक्या चाकरमान्यांनी…
दोन चार दिवस…
भारी चर्चा केली…

विचारबंदीच्या देशात…
नोटबंदी आली…
भ्रष्टाचाराची मंडी…
मंद झाली…

जयंत प्र. पोतदार