धर्म

कोणीतरी म्हटलेच आहे की धर्म ही अफूची गोळी आहे. वास्तविक पाहता एखाद्या विशिष्ट धर्मात किंवा आपल्याला आवडणा-या धर्मात जन्म घेणे हे आपल्या हातात नसते; हाच दुवा घेऊन जर विचार केला तर, जन्म घेतल्यानंतर होणा-या धार्मिक संस्कारांच्या मा-याचा परिपाक जर माणसाला धर्मांध अथवा धार्मिक बनण्यास उद्युक्त करत असेल तर ते त्या धर्माचे फार मोठे अपयश आहे असे मी समजतो.

प्रत्येक धर्माची एक स्वतंत्र विचारधारा असते. बरेच जणांच्या मते हिंदू हा धर्म नसून एक विचारधारा आहे संस्कृती आहे. माझे म्हणणे असे आहे की प्रत्येक धर्म हा एक स्वतंत्र विचारधारा आहे, संस्कृती आहे.

हिंदु धर्मानी सहिष्णुता शिकवली पण रूढी परंपरा आणि कर्मकांडात वाया गेला. वर्षभर सण, उत्सव साजरे करणे ते पण रस्त्यात खड्डे करून, ध्वनीप्रदूषण करून समाजाला त्रास देऊन हिंदु धर्माच्या अनुयायांना कसला आनंद मिळतो कोण जाणे. हिंदु धर्म सहिष्णु म्हणावा तर आपले दलित बांधव हिंदु धर्म सोडून इतर धर्मात का जातात? सगळाच गोंधळ.

कट्टर हिंदुत्ववादी सावरकरांच्या नावाचा सोयीस्कर वापर, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चाललेले राजकारण हे बघून उबग येतो. सावरकर आदर्श म्हणावेत तर तथाकथित हिंदुत्ववादी गोरक्षक सावरकरांच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाच्या विचारांचा आदर करताना कुठेच दिसत नाहीत. सावरकरांनी तर स्पष्टपणे सांगितले आहे की गाय हा उपयुक्त पशू आहे.

शिवाजीमहाराजांचे विचार अंगी बाळगताना तर त्यांचे अनुयायी कधीच दिसले नाहीत. शिवस्मारक बांधण्यात सर्व सामान्य करदात्यांचे पैसे घालविण्यापेक्षा आहेत त्याच गड किल्ल्यांचे संवर्धन करून महाराजांचे विचार अंगिकारले तर फार बरे होईल पण त्यांच्या अनुयायांचे विचार; महाराजांचे नाव वडा पावाला देण्यापलीकडे जातच नाहीत.

इस्लाम धर्माची जगभर चाललेली वाताहत तर आपण बघतच आहोत. सगळ्यात तरूण धर्म बहाई ज्याचा जन्म इराण मध्ये एकोणीसाव्या शतकात झाला. सर्वधर्म समभाव आणि सगळ्यांचा देव एक आहे या तत्वज्ञानावर आधारीत. त्याचे तत्वज्ञान चांगले आहे पण समस्या ही आहे की कोणत्याही धर्माचे अनुयायी जेव्हा आपापल्या धर्माचे अतिरेकी अंधानुकरण करतात तेव्हा अहंकार निर्माण होतो आणि हेच घातक आहे. म्हणून प्रत्येकाने आत्मचिंतन केले पाहिजे कदाचित साक्षात्कार झाला तर समजेल की मानवधर्म हाच सगळ्यात जुना आणि चिरंतन धर्म आहे. चला तर धर्मांतर करूया मानवधर्मात पुन्हा एकदा.

जयंत प्र. पोतदार

निसर्ग एक अनुभूती …

पाऊस धो धो पडत होता. रविवारची सकाळ…मस्तपैकी आराम करायचा सोडून, निसर्ग भ्रमंती करण्याचा निर्णय घेतला. अनायसे विरारला, सासुरवाडीला आलोच होतो, म्हटल ट्रेकिंगची हौस भागवून घ्यावी. जीवदानीच्या डोंगरावर जायचा निर्णय घेतला. बायकोला विचारले येतेस का? ती म्हणाली एवढ्या पावसात मी नाही येणार पण जाताना छत्री मात्र घेऊन जा. मी म्हणालो वेडी आहेस का? मी पावसात मनसोक्त भिजणार, निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेणार.

जीवदानीचा डोंगर चढायला सुरवात केली. प्रत्येक पायरीवर श्रद्धेचे, देवाचे दलाल ठाण मांडून बसले होते. त्यांना चुकवत मी एक-एक पायरी चढत होतो. तरीसुद्धा एका दुकानदाराने मला पकडलेच, साहेब देवीसाठी पुजेचे ताट घेऊन जा, त्याने विनविले. मी म्हणालो,”मित्रा, मी देवळात नाही, निसर्गाचा आस्वाद घ्यायला डोंगरावर जात आहे आणि देव म्हणशील तर तो माझ्या हृदयात आहे.” माझे म्हणणे त्याला पटले असावे कदाचित, तो म्हणाला, बरोबर आहे साहेब तुमचे आणि उत्स्फूर्तपणे त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला चपला इथेच राहू द्या, पैसे नका देऊ. मी म्हणालो, मला देवळात नाही डोंगरावर जायचे आहे, पावसात मनसोक्त भिजायचे आहे, निसर्गातच देवाला शोधायचे आहे. दुकानदार म्हणाला साहेब तुम्हाला देवीच्या मंदिरातूनच डोंगरावर जायचा मार्ग आहे. मी म्हटले झाली का पंचाईत, नाईलाजाने चपला तिथेच काढून मी मंदिरातून डोंगरावर जायला निघालो.

एकदाचा डोंगरावर पोहोचलो, मुसळधार पावसात यथेच्छ भिजलो. डोळे भरून हिरवाईचा, डोंगरावरून कोसळणार् या धबधब्यांचा आस्वाद घेतला. निसर्ग माझ्यावर त्याच्या किमयेची उधळण करतच होता. मध्येच एखाद्या सुंदर पक्षाचे दर्शन होताच, शीळ कानावर पडताच मन तृप्त व्हायचे.

निसर्गाच्या किमयेची उधळण अंगावर झेलत माझी मार्गक्रमणा चालू होती. अचानक लक्षात आले… निसर्गाने माझ्यावर केलेल्या उधळणीची परतफेड करायची हीच योग्यवेळ आहे. वर्षभर न विसरता साठविलेल्या वेगवेगळया फळांच्या बियांची उधळण मी सुद्धा निसर्गावर करत गेलो आणि तृप्त मनाने परतीच्या प्रवासाला लागलो.
जमेल तश्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत मी डोंगर उतरू लागलो.

अचानक एक चहाची टपरी माझ्या नजरेस पडली. म्हटल वाह क्या बात है! एक मस्त कडक चहाची ऑर्डर मी चहावाल्याला दिली. चहा पिताच तोंडातून शब्द आले अप्रतिम! तो म्हणाला साहेब काॅफीपण पिऊन बघा. काॅफीपण अप्रतिम होती. मी विचारले किती झाले. तो म्हणाला वीस रूपये झाले साहेब. मी म्हणालो, तुझी काहीतरी चूक होते मित्रा, मी काॅफीसुद्धा प्यायलो. नाही साहेब दोन्ही मिळून वीसच रूपये,तो म्हणाला . मी विचारले, तुला एवढे स्वस्त परवडते तरी कसे? माझी आस्था पाहून त्याने मला त्याची कर्मकहाणी सांगितली, म्हणाला महिन्याचे तीस हजार रूपये भाडे देतो. मी म्हणालो, मग भाव वाढव की चहा-काॅफीचा, एवढ्या वरती येऊन कुणी ही हसत-हसत जास्त पैसे देईल. तो म्हणाला मंदिर कमिटी आम्हाला दर वाढवायला परवानगी देत नाही साहेब. मी म्हणालो कमालच आहे. तो म्हणाला साहेब तुम्ही एव्ह्ढी आस्था दाखविलीत, विचारपूस केलीत बरे वाटले. त्याचा निरोप घेऊन, प्लास्टिकच्या बाटल्यांचे गाठोडं घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेतच निर्माल्य-कलश दिसला, गोळा कलेला प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा कलशात टाकला.

पुन्हा मंदिरमार्गे झपझप पायर् या उतरू लागलो. अचानक मला जाणवले की कोणीतरी माझा हात पकडला आहे. मागे वळून बघितले तर एक वृद्ध गृहस्थ माझ्या हाताचा आधार घेऊ ईच्छित होते. मी म्हणालो आजोबा काळजी करू नका, मी तुम्हाला पायथ्याशी सोडतो. आजोबा म्हणाले, “नाही रे बाळा पायर् या निसरड्या आहेत म्हणून भिती वाटते, मला फक्त मंदिराच्या गाभार् या पर्यंत सोड.” मी म्हणालो ठिक आहे. आजोबांची कर्मकहाणी ऐकत ऐकत मी हळूहळू पायर् या ऊतरू लागलो. गाभार् या जवळ पोहोचताच आजोबांनी मला आशिर्वाद दिला, म्हणाले देव तुझे भले करो आणि ते गाभार् यात निघून गेले. तेवढ्यात मला पुजार् याने खेकसून सांगितले गाभार् यात जागा नाही, तुम्हाला थांबावे लागेल.मला गाभार् यात जाण्यात रस नाही हे सांगण्यासाठी मी मागे वळून बघितले आणि माझी गाभार् यातील देवीशी नजरा नजर झाली. जणूकाही ती मला सांगत होती,” तू गाभार् यात नाही आलास, तरीसुद्धा मी तुझ्यावर प्रसन्न आहे कारण वर्षानूवर्ष माझ्या बरोबर राहून सुद्धा या पुजार् याना आणि श्रद्धेच्या दलालांना मी कळले नाही पण तू मला ओळखलेस, तुला मी कळले, कारण तू माणसांमधला, निसर्गामधला देव ओळखलास, तू माणसांची सुख दुःख जाणून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न केलास आणि हो तू माझ्यासाठी पुजेच ताट आणून, माझ्यावर फुले उधळली नाहीस, ह्याचा सुद्धा मला राग नाही आला कारण तू निसर्गावर बियांची उधळण केलीस हिच खरी पुजा. तू गाभार् यात नाही आलास किंवा तुला पुजार् याने गाभार् यात येऊ दिले नाही, तरी तू माझ्या हृदयाच्या गाभार् यात कधीच विराजमान झाला आहेस.” देवीचा आशिर्वाद घेऊन, एका अविस्मरणीय अनुभूतीचा साक्षात्कार घेऊन मी भारावलेल्या मनाने परतीच्या प्रवासाला निघालो.

-जयंत प्रल्हाद पोतदार