तू

फक्त आजच का दिवस तुझा…
प्रत्येक दिवसावर असतो तुझाच ठसा…
सकाळ असो वा संध्याकाळ…
तुझ्याशिवाय सरकत नाही काळ…

क्षणात पत्नी आई क्षणात…
अस्तित्व तुझे प्रत्येक रूपात…
अर्थ नात्यांचा आहेस तू…
तुच करशी नात्यांचा सांभाळ…

तू नाहीस तर अधुरा संसार…
संसाररूपी गाड्याचा तुच आधार…
विस्कटलेल्या नात्यांची…
तुच जोडशी माळ…

समजू नकोस स्वतःस अबला…
तुझ्यातच होती एक कल्पना चावला…
आदिशक्ती रूप तुझे…
वंदन तुला तिन्ही त्रिकाळ…

जयंत प्र. पोतदार

Advertisements

रंगबावरी

रंग तुझे आगळे…
कशी मी ओळखू कान्हा…
बदनाम मी राधा…
काय सांगू जना…

जगसोयरा तू हरी..
मी तुझी रंगबावरी…
शाम तू निळा सावळा…
कशी मी रंगू तुझ्याविना…

सावळ्या संध्याकाळी…
अशा या कातरवेळी…
सूर वाट पाहती मुरलीचे…
ओतून प्राण काना…

रंगात रंगून घे…
उधळून सर्व रंग ये…
ठेव रंग एकच मजसाठी…
शाम रंग मिळून उधळूया ना…

जयंत प्र. पोतदार

वर्ष

अजून एक वर्ष सरलं…
आठवणींच्या धाग्यात…
अनुभवांचं कडू गोड…
पर्व जुडलं…

उजाडताच दिवस सरला…
तोकडी रात्र चिंता उरल्या…
आव्हानांच धनुष्य पेलत…
आयुष्याचं लक्ष्य छेदलं…

सरते वय निसटते क्षण…
तृप्त जरी वाटे अतृप्त मन…
आशा निराशेच्या हिंदोळ्यावर…
जीवनाचं अस्तित्व झुललं…

आकाश तेच तिच माती…
जुनी काही नविन नाती…
जुन्या आठवणींवर…
कॅलेंडरचं अजून एक पान पडलं…

जयंत प्र. पोतदार

 

अधुरे चित्र

आठवणीत तुझ्या…
दिवस‌ किती सरले मोजताना…
माझी न मी उरले…
अधु-या चित्रात रंग भरताना…

रंग भरले मी…
तू दिलेल्या स्वप्नांना…
तुझ्या आठवणींची किनार…
मोरपिशी स्वप्न पंखाना…

तुझ्या गरुडपंखी कवेत…
सारे जग सामावताना…
आठवते तुझी भरारी अजूनही…
क्षितिजाचा वेध घेताना…

चित्र अधुरे तसेच ते आजही…
भरशील रंग तू कधीतरी परतूनी…
हीच आशा वेडी…
माझ्या चित्रातील रेघांना…

जयंत प्र. पोतदार

प्रेमगीत

विसरलीस तू जरी…
जागा प्रेमाची…
प्रेमगीताचा स्वर…
अजून मी विसरलो नाही…

स्वरांचे संगीत…
घाली रुंजी मनाशी…
सुरांचा साज अजून…
ओसरला नाही…

विसरलीस तू…
प्रेमगीत जरी…
गोडी रियाजाची…
मी विसरलो नाही…

भेटशील तू कधीतरी…
मैफिलीत सुरांच्या म्हणून…
गीतांचे शब्द तुझ्या…
एकटाच गुणगुणलो नाही…

जयंत प्र. पोतदार

प्रेमपत्र

धाडस नाही…
तेव्हा केले…
माझे प्रेम…
कागदावरच राहिले…

अव्यक्त प्रेमभाव …
मनी दाटलेले….
उतरवताच कागदावर…
हृदय हलके झाले…

विरून गेला बराच काळ…
नाही लागला तुझा ठाव….
कागदावरल्या शब्दांमधेच…
मी माझे प्रेम शोधले…

सापडताच अचानक…
कागद तो जीर्ण…
शब्द विटक्या शाईचे…
अधिकच गडद झाले…

जयंत प्र. पोतदार

पुळणावरची नक्षी

समुद्र किनारी…
लाटांची गाज…
बरेच दिवसांनी एकटाच …
ऐकत होतो आज…

पुसत होती…
नक्षी आठवणींची…
थडकूनी पुळणावर…
एक एक लाट…

शोधत होतो…
मारलेल्या रेघा दोघांनी…
उमटवून वाळूवर…
हृदयी कोरलेले तुझेच नाव…

पोकळीत शंखाच्या …
लावूनी एक कान…
घेत होतो तुझ्या…
पोकळ वचनांचा ठाव…

जयंत प्र. पोतदार

माझा चंद्र

चांदण्यात पौर्णिमेच्या…
मुखचंद्र मी पाहिला…
शीतल रात्रीस आज…
तुझाच ध्यास लागला…

स्पर्श तुझा मखमली…
हास्य टिपूर चांदणे…
केशरी दुधात चंद्र…
लाजून का विरघळला…

शोधताच प्रतिबिंब…
तुझेच आज सापडले…
चंद्रास आज पौर्णिमेच्या …
अस्तित्व कोडे का पडले…

लपूनी ढगाआड त्याने…
हळूच वेध घेतला…
सारूनी बट एकएक…
चंद्र मी ही पाहिला…

जयंत प्र. पोतदार

थडगे माणुसकीचे

नको आम्हा पूल…
चालेल विझलेली चूल..
दोन वेळच्या भाकरीची…
उगा कशाला भूल…

आयुष्य तुमचे किमतीचे…
जगणे आमचे किड्या मुंगीचे…
बुलेटचे वेध तुम्हा …
आम्हा मृत्यूचा पूल…

दिवस पडे कमी आम्हा…
शमविण्या पोटाची भूक…
तृप्त पोटी मानगुटी तुमच्या…
नाईट लाईफचे भूत…

मरण खरोखरच स्वस्त येथे …
अच्छे दिन स्वस्ताईचे…
शिवस्मारक; लोहपुरूषा शेजारी…
थडग्यात गाडा एकदाच माणुसकीचे भूत…

जयंत प्र. पोतदार

साथ तुझी

 

(वीरपत्नी स्वाती महाडीकांसारख्या अनेक वीरांगनांचे मनोगत मांडण्याचा प्रयत्न मी या कवितेत केला आहे.)

वाटे सरू नये…
कधीच ही रात्र अशी…
आज तू माझा जरी…
नसशील उद्या माझ्या कुशी…

स्वप्न भासे साथ ही…
जीवनी सहवास पारखी…
मरणाचा ध्यास तू…
जगण्यास मी एकटी अशी…

थकले पाहूनी वाट आता…
तुजविण एकाकी अशी…
गेलास सोडून अर्ध्यात मिठी…
विसावलास मातृभूमीच्या कुशी…

विरह हा सोसवेना मज…
स्वप्नात तू मज खुणविशी…
तुझेच स्वप्न आता माझे…
कुस मातृभूमीची अन साथ तुझी…

जयंत प्र. पोतदार