पुळणावरची नक्षी

समुद्र किनारी…
लाटांची गाज…
बरेच दिवसांनी एकटाच …
ऐकत होतो आज…

पुसत होती…
नक्षी आठवणींची…
थडकूनी पुळणावर…
एक एक लाट…

शोधत होतो…
मारलेल्या रेघा दोघांनी…
उमटवून वाळूवर…
हृदयी कोरलेले तुझेच नाव…

पोकळीत शंखाच्या …
लावूनी एक कान…
घेत होतो तुझ्या…
पोकळ वचनांचा ठाव…

जयंत प्र. पोतदार

Advertisements

माझा चंद्र

चांदण्यात पौर्णिमेच्या…
मुखचंद्र मी पाहिला…
शीतल रात्रीस आज…
तुझाच ध्यास लागला…

स्पर्श तुझा मखमली…
हास्य टिपूर चांदणे…
केशरी दुधात चंद्र…
लाजून का विरघळला…

शोधताच प्रतिबिंब…
तुझेच आज सापडले…
चंद्रास आज पौर्णिमेच्या …
अस्तित्व कोडे का पडले…

लपूनी ढगाआड त्याने…
हळूच वेध घेतला…
सारूनी बट एकएक…
चंद्र मी ही पाहिला…

जयंत प्र. पोतदार

थडगे माणुसकीचे

नको आम्हा पूल…
चालेल विझलेली चूल..
दोन वेळच्या भाकरीची…
उगा कशाला भूल…

आयुष्य तुमचे किमतीचे…
जगणे आमचे किड्या मुंगीचे…
बुलेटचे वेध तुम्हा …
आम्हा मृत्यूचा पूल…

दिवस पडे कमी आम्हा…
शमविण्या पोटाची भूक…
तृप्त पोटी मानगुटी तुमच्या…
नाईट लाईफचे भूत…

मरण खरोखरच स्वस्त येथे …
अच्छे दिन स्वस्ताईचे…
शिवस्मारक; लोहपुरूषा शेजारी…
थडग्यात गाडा एकदाच माणुसकीचे भूत…

जयंत प्र. पोतदार

निष्क्रीयतेचे बळी

आज एलफिंस्टन रोडवर झालेल्या चेंगराचेंगरीची बातमी ऐकून मला बरेच वर्षांपूर्वी काळूबाईच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीची आठवण झाली. दोन्ही ठिकाणी बळी गेले हे फारच वाईट झाले. काळूबाईचे बळी (अंध)श्रद्धेचे बळी होते परंतु आज घडलेली घटना ही अत्यंत चीड आणणारी आहे.

काळूबाईच्या जत्रेला जाणे; न जाणे हा सर्वस्वी ऐच्छिक निर्णय होता पण दोन वेळची पोटाची खळगी भरण्यासाठी जाणा-या चाकरमान्यांचे बळी जाणे ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे.

दोन्ही ठिकाणी प्रशासनाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली त्याचबरोबर जमावाची मानसिकताही या दुर्घटनेला थोड्या फार प्रमाणात जबाबदार आहे. काही मुठभर लोकांनी पसरवलेली अफवा, पावसामुळे झालेली कोंडी अशा अनेक विचित्र गोष्टींमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक निष्पापांचे हकनाक बळी गेले.

पुलाची रुंदी केवळ सहा फूट त्यात पश्चिम आणि मध्य रेल्वे दोन्ही बाजूनी येणारा लोकांचा रेटा या गोष्टी वर्षानुवर्षे दुर्लक्षित करणारे प्रशासन व तथाकथित स्थानिक लोकप्रतिनिधींचे, स्थानकाचे सद्य नाव बदलून प्रभादेवी करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न सगळच हास्यास्पद. कोणत्याही स्थानकाचे नाव बदलून विकास होत नसतो, तोच पाठपुरावा त्यांनी मुलभुत सुविधांसाठी केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती.

प्रशासनाला निदान एवढेतरी समजायला हवे होते की पुलाची लांबी आणि रुंदीचे व्यस्त प्रमाण हे कधीतरी निष्पाप लोकांच्या बळींचे निमित्त होऊ शकते?

सामान्य लोकांनी रस्त्यावरून चालावे तर खड्डयांचा बळी व्हावे, ट्रेननी जावे तर ह्या अशा घटना आणि आपले सरकार; आमदार खासदारांचे वेतन व भत्ते वाढविण्यात आणि फक्त पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्ल आजीवन निवृत्ती वेतन देण्यात मग्न.

येथे एक गोष्ट दखल घेण्यासारखी आहे कि सामान्य सरकारी नोकरदारांचे निवृत्ती वेतन, जे 2004 नंतर नोकरीला लागले आहेत ते बंद करण्यात आले आहे व सामान्यांच्या जीवावर मजा करणा-या लोकप्रतिनिधींना पाच वर्षे भ्रष्टाचार केल्याचे बक्षिस म्हणून आजीवन निवृत्ती वेतन ते सुद्धा करदात्यांच्या पैशांमधून. हाच पैसा जर अशा नाठाळांवर उडविण्यापेक्षा मुलभूत सुविधांसाठी वापरला तर सामान्यांचे आयुष्य थोड्या फार प्रमाणात सुखकर होण्यास मदत होईल. बुलेट ट्रेनला तर अनुल्लेखानेच मारलेले बरे.

मायबाप सरकारला माझी हात जोडून एकच विनंती कि सामान्य लोकांच्या सहनशक्तीचा अंत बघू नका, नाहीतर काळ तुम्हाला माफ करणार नाही.

जयंत प्र. पोतदार

 

साथ तुझी

 

(वीरपत्नी स्वाती महाडीकांसारख्या अनेक वीरांगनांचे मनोगत मांडण्याचा प्रयत्न मी या कवितेत केला आहे.)

वाटे सरू नये…
कधीच ही रात्र अशी…
आज तू माझा जरी…
नसशील उद्या माझ्या कुशी…

स्वप्न भासे साथ ही…
जीवनी सहवास पारखी…
मरणाचा ध्यास तू…
जगण्यास मी एकटी अशी…

थकले पाहूनी वाट आता…
तुजविण एकाकी अशी…
गेलास सोडून अर्ध्यात मिठी…
विसावलास मातृभूमीच्या कुशी…

विरह हा सोसवेना मज…
स्वप्नात तू मज खुणविशी…
तुझेच स्वप्न आता माझे…
कुस मातृभूमीची अन साथ तुझी…

जयंत प्र. पोतदार

जात

शोधता शोधता…
सापडली मला जात…
हसली बघून मजकडे….
घेऊनी हाती माझा हात…

होतो फडकवत झेंडा…
दुराभिमानी हातात…
पेटवूनी वणवा द्वेषाचा…
हसत होतो गालात…

नव्हते ध्येय कोणतेही…
विशेष माझ्या मनात…
जातीसाठी काहीही…
फक्त हाच विचार डोक्यात…

देऊनी नारे दमलो थकलो…
पडली कोरड घशात…
होती खुणावत भुकही आता…
वणवा असह्य पोटात…

धीरही सुटला आता माझा…
घुसलो तडक उपहारगृहात. …
मारूनी ताव आडवा तिडवा…
विचाराया विसरलो आचा-याची जात…

शोधता शोधता…
सापडली मला जात…
हसली बघून मजकडे….
घेऊनी हाती माझा हात…

जयंत प्र. पोतदार

विचारांचा गाळ

( जीवनदाते दिपक अमरापूरकरांच्या मृत्यू नंतरचे वास्तव)

जीवनदाताच जीवनास मुकला…
हा काय अनर्थ घडला…
हळहळ सांत्वन केवळ…
आता एक उपचार उरला…

मन ही मेले…
वाटे आता…
माणसामधील माणूस…
वाहून गेला…

वाट बघणे का हाती …
नव्या बळीची आता…
लालफितीची चर्चा झाली …
किती बळींचा विचार केला…

नाठाळांच्या मुखी आता…
केवळ उद्धट राळ उरला…
दोष देऊ आता कोणा…
विचारांचा गाळ उरला…

जयंत प्र पोतदार

 

उद्धटा अजब तुझे सरकार

उगीचच उद्धट साहेबांवर भलते सलते आरोप करू नका. खड्डे-खड्डे म्हणून त्याच्या नावाने खडे फोडलेत पण त्याची दूरदृष्टी तर पहा, आज गरीबांना कोणीच वाली नसताना हे उद्धटसाहेब त्यांच्या बाजूने उभे आहेत. गरीबांनासुद्धा मन आहे इच्छा आकांक्षा आहेत. गरीबांना सुद्धा तरण तलावात पोहायला आवडते. आज उद्धट साहेबांच्या दूरदृष्टी ला सलाम केलाच पाहिजे. नालेसफाई आणि खड्डयांच्या नावाने उगीचच बोटे मोडू नका. ते आपल्यासारख्या सर्व सामान्यांसाठीच झटत आहे. बघा किती बरे वाटत असेल त्यांना जेव्हा ते बघतात गरीबांची मुले सुखनैव रस्त्यावरच पोहतात तेव्हा. Cruise ची सफर सामान्यांना परवडणारी आहे का? आज तुंबलेल्या रस्त्यात चारचाकी वाहनात अडकलेल्यांना स्वस्तात हा अनुभव दिलाच ना उद्धटसाहेबांनी?

ज्युनिअर उद्धट साहेबांबद्ल काय बोलावे ते तर केव्हापासून नाईट लाईफ…नाईट लाईफ बोंबलत आहेत. शेवटी ऑफिसमध्ये अडकून घेतलाच ना नाईट लाईफचा आनंद. दक्षिण मुंबईत अडकलेल्यांच्या मनोरंजनासाठी त्यांनी पेंग्विनचीपण सोय करून ठेवली आहे शिवाय बॅकबेला समुद्रात भराव टाकून मनोरंजन उद्यान बनविणे, महाराजांचे भव्यदिव्य स्मारक बनविणे ही काय लोकोपयोगी कामे नाहीत का? त्यामुळे पुढच्यावेळी रस्त्यावर ह्याच्यापेक्षा जास्त पाणी तुंबेल आणि सामान्य जनतेला रस्त्यावर पोहण्याचा अजून चांगला अनुभव घेता येईल.

आणि हो; महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी मराठी मुलांना वडा पावच्या गाडीच्या पुढे जाऊच दिल नाही असे म्हणणा-यांनी जरा विचार करावा, रात्री ऑफिसमध्ये वडा पाव खाऊनच झोपलात ना? माझी सगळयांना एकच विनंती आहे उगाचच उद्धटसाहेबांच्या नावाने खड्डे…साॅरी खडे फोडताना जरा विचार करावा. उगीचच बोंबलू नका उद्धटा अजब तुझे सरकार.

तळटीप: वरील लेख काल्पनिक आहे. सर्व पात्रे Banana Republic मधील काल्पनिक पात्रे आहेत. पावसात अडकल्यावर काहीच काम नव्हते म्हणून हा लेख लिहीला आहे.

जयंत प्र. पोतदार

 

आधुनिक…अध्यात्मिक भारत

 

हीच का ती साधू संतांची परंपरा? आणि हेच का आपले संस्कार असा कधी कधी मला प्रश्न पडतो. महावीर जैन, गौतम बुद्ध, गुरू नानक, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद अगदी महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर ज्ञानोबा आणि तुकोबांच्या संस्कारात वाढलेले आपण. असे असताना आज जे आपण स्वयंघोषित संत, बाबा-बुवांचे चाळे आणि अध्यात्माच्या नावाखाली उघडलेले बलात्काराचे कारखाने बघितल्यावर असा प्रश्न पडतो की आपल्याला मिळालेली साधू संताची परंपरा समजण्यास किंवा पेलण्यास आपला समाज नालायक आहे का?

जास्त खोलात विश्लेषण केल्यास असे वाटते की ज्या पाश्चिमात्यांना आपण मोकळे ढाकळे, आधुनिक विचारसरणीचे आणि मुक्त लैंगिकतेचे पुरस्कर्ते समजतो तेच जास्त संस्कारक्षम वाटतात. पाश्चात्यांना आपल्यासारखी साधू संताची गौरवशाली परंपरा आणि संस्कार नसतानासुद्धा ते स्त्रियांचा खुप आदर करतात. मला आश्चर्य या गोष्टीचेच वाटते की ज्या पाश्चात्यांना आपण संस्कारहीन समजतो तेथे कोणत्याही स्त्रीच्या संमतीशिवाय शरीरसंबध ठेवले जात नाहीत आणि योनी शुचितेचे अवडंबर असलेल्या आपल्या देशात आणि ऋषी मुनींची गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या देशात हे आधुनिक अध्यात्मिक गुरू असे का वागतात?

कदाचित ह्याचे उत्तर असेही असेल की चर्चिल म्हणाल्या प्रमाणे आपला समाज स्वातंत्र्य उपभोगण्यास लायक नाही आहे. एकदंरीतच सद्य परिस्थिती पहाता असेच वाटते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, ओरबाडणे, वखवखाट…JNU मधील आजादी की लडाई,वाचाळ पत्रकारीता आणि reforms ला विरोध.

हे सगळ बघितल्यावर प्रश्न पडतो की खरोखरचं आपण ब्रिटीशांच्या राज्यात गुलामगिरीत होतो की गेली सत्तर वर्षे एका विशिष्ट घराण्याची गुलामगिरी करण्यात आपला समाज धन्यता मानत होता म्हणून ही वेळ आली? खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे.

जयंत प्र. पोतदार

 

ही कोणत्याही धर्माची खरी शोकांतिका आहे. आसाराम, अनुष्ठानाच्या नावाखाली स्वतःची शारिरीक भूक भागवत होता. राम रहिम रामाच नाव घेऊन; कृष्णाचा दाखला देऊन साध्वींचा उपभोग घेत होता. खरा कृष्ण त्यांना कळलाच नाही. सोळा सहस्त्र नारींचा उपभोग घेणारा एवढाच सोयीस्कर अर्थ घेणारे हे भोंदू अध्यात्मिक गुरू अजून किती जणांचा बळी घेणार आहेत? हे थांबलेच पाहिजे.

वास्तविक पाहता हिंदू धर्म अथवा कोणताही अन्य धर्म हा सोयीचा मामला झाला आहे.हिंदू धर्माच्या बाबतीत म्हणायचे झाले तर श्रीकृष्ण कोणालाच कळला नाही. कृष्णाने सोळा हजार स्त्रियांचा कधीच उपभोग न घेता तो त्यांचा रक्षणकर्ता झाला. भले कृष्ण ही व्यक्तीरेखा काल्पनिक आहे असे क्षणभर मानले तरी कृष्णाने सांगितलेली भगवदगीता हा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे ज्याचा उपयोग करून, विख्यात management guru, Peter Drucker याने अनेक पुस्तके लिहिली आहेत. तो स्वतः, कृष्णाला management guru आणि भगवदगीतेला उत्कृष्ट management ग्रंथ मानतो. Peter Drucker, कृष्णाला आणि भगवदगीतेला प्रेरणास्थान मानतो.

आपले भारतीय अध्यात्मिक गुरू कृष्णाला फक्त भोगी समजतात आणि होळीच्या दिवशी मोठमोठ्या पिचका-या घेऊन नाचेगिरी करण्यात मग्न असतात विशेष म्हणजे अंधभक्तपण त्यांना साथ देतात.

कृष्णाला प्रेरणास्थान मानून एक विदेशी व्यक्ती जगप्रसिद्ध management guru बनू शकते आणि आपलेच स्वदेशी, विकृत अध्यात्मिक गुरू, सोयीस्कर अर्थ घेऊन कृष्णाला आणि आपल्या धर्माला बदनाम करण्यात व्यग्र असतात.

जयंत प्र. पोतदार